Friday, October 17, 2008

नसीरभाई आणि लेबल्स...!

नसिरुद्दीन शहा घसरले. जाता जाता घसरले. मीडियावर. आणि ही घसरण सोयीस्कर विसरलीच गेली बातम्यांमधून. नसीरभाईंच्या भाषणाला अशी 'कल्टी' मारली गेली, म्हणून भाषणातील तो मुद्दा सांगायलाच हवा.

काल पुण्यात आशियाई चित्रपट महोत्सव सुरू झाला. त्यातील झेनिथ सन्मान नसीर यांना प्रदान करण्यात आला. नसीर बोलणार म्हणून विलक्षण उत्सुकता होती. चित्रपट माध्यमाने त्यांना अमाप लोकप्रियता मिळवून दिली, तरी त्यांचे 'FIRST LOVE' हे नेहमी 'थिएटर' आहे. त्यामुळं नसीरभाई चित्रपटांना, विशेषत: लाथा घालतील, हे अपेक्षितच होतं. तसं झालंही. जाता जाता एक लाथ मीडियालाही घातली त्यांनी !

नसीर म्हणाले, 'सत्तरच्या दशकांत काही वेगळे चित्रपट तयार झाले. लगेच असं वातावरण बनवण्यात आलं, की आता भारतीय चित्रपटच जणू बदलतोय. जगातल्या सर्वोत्तम शोधा इतकेच हे चित्रपट महत्वाचे आहेत, असं जणू भासविण्यात आलं. आपल्या मीडियाला लेबल चिकटवायची सवय आहे. 'वेव्ह', 'मेनस्ट्रीम', 'आर्ट', 'फलाना फलाना' अशी त्याला चिकटवली गेली. आणि जसे हे वेगळे चित्रपट आले, तसेच गेलेही. काही 'वेव्ह' वगैरे तयार झाली नाही...'

नसीरभाईंनी जाता जाता दिलेला हा टोला मनावर घेण्यासारखाच आहे. अलिकडं आपलीच डोकी इतकी सपाट असतात, की जरा कुठं उंचवटा दिसला, की सुरू होतं, 'ही टेकडी आहे...'. पुढचा उठतो आणि 'हा डोंगर आहे...', असं घोषित करतो. त्याच्या पुढचा 'पर्वत' म्हणतो...आणि मग ही माळ सुरूच होते. एकामागोमाग एका लेबल्सची!

लेबल लावण्यापूर्वी विचार करा, एवढा नसीरभाईंचा सल्ला. त्याला कल्टी न मारणे....!!

No comments: